August 2nd 2006
जखमांची कर्जे नि कर्जांच्या जखमा
पकूशेठने आपल्या डोळ्यापुढून चाळीसाव्यांदा ती यादी फिरविली आणि पुन्हा एकदा दुःखात वाहून गेले. त्यांच्या यादीत होते अशी काही नावे, ज्यांना त्यांनी उधारी दिली होती. पण घेणाऱ्यांना ती उधारी वाटत नव्हती. त्यांच्यालेखी ते पकूशेठचे त्यांच्यावरील ऋण होते व आजन्म त्याच ऋणात राहण्याचा संकल्प त्यांनी केला होता. त्यातील काहीजणांनी पकूशेठकडेच नव्हे तर त्यांच्या घराच्या आसपासदेखील फिरकायचे थांबविले होते.
पकूशेठना त्रास होत होता तो त्याचा. एकवेळ पैसे नका देऊ पण असे वागू नका. निदान सांगा तरी पैसे नाही परत करता येणार म्हणून, असे त्यांचे म्हणणे होते. यादी एकेचाळीसाव्यांदा वाचताना त्यांना यादीतील थोर मंडळींनी सांगितलेल्या सबबी आठवल्या. त्या अशाः दिनू दिवेकरः काय पकूशेठ. बरे झाले दिसलात. मला आत्ता काही पैसे हवे होते. इंजिनिअरिंगचा अर्ज भरायचा आहे. हे आत्ताचे व आधीचे सगळे एकत्रच घ्या. पकूशेठः अरे असे कसे..एकतर आधीच्या पैशाला आता वर्ष होत आले…तितक्यात दुसरे कर्ज? दिनूः नाही ना जमत? मग आता हटकू नका. ऐपत असेल तर आणखी पैसे द्या. नसेल तर जुने परत मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार तुम्हाला नाही..समजले….? धाड…धाड…धाड….चार लोकांना ऐकू जाईल असा आवज करीत दिनू निघून गेला.
—अंता बोंबीलकरः काय पकूशेठ, आज इकडे कुठे पकूशेठः काही नाही…तेच तुमच्याकडे माझे येणे बाकी विचारायला आलो होतो. अंताः येणे बाकी…ती तुम्हाला असेल. आम्हाला देणे बाकी काही नाही. पकूशेठ पैसे कुठे पळूनशान जातात का…कशाला उगा त्रास करुन घेता…एवढे मोठे सावकार तुम्ही..आमच्यासारख्याच्या पोटावर पाय कसा द्यावा वाटतो हो तुम्हाला… पकूशेठः पोटावर पाय… अंताः मग नाय तर काय…अहो…तुमच्या पैशातून आणलेली होंडा परवाच विकली. त्यातून जे काही मिळाले होते..त्यातून ही फळाची गाडी घेतली. आता तुमी पैशे मागितले तर मला ही गाडी विकावी लागेल..बरं ती विकूनही फायदा नाही.कारण त्यातून तुमची उदारी फिटणार नाही. आणि जरी विकली तरी तुमचेबी भागणार नाही आणि आमचेबी. त्यापेक्षा जवाकधी धंद्याला बरकत ईल, तवा तुमच्याकडे ही गाडी घेऊनशान येतो की नाय बघा… अंताची गाडी कधी आलीच नाही आणि `हेच फळ काय मम पैशाला…`असा विचार करीत पकूशेठ दुःखी झाले.
— साहेबराव अण्णाः काय पकू..कसा आहेस..लेकरंबाळं मजेत हायंत नवं…? पकूशेठः सगळं बरं आहे…मी जरा त्या माझ्या पैशाची आठवण करुन द्यायला आलो होतो… अण्णाः पैसे…मला आठवतं तसं तू मला काही देणं नाहीस लागत…. पकूशेठः तसं नाही अण्णा…तुम्ही माझ्याकडनं घेतले होते.. अण्णाः तुझ्याकडून….? कधी पकूशेठः अण्णा दोन वर्ष झाली..दोनचारदा तुमच्या कडे निरोपबी धाडला होता. अण्णाः नाही बा…मला काहीच निरोप नाही आला…बरं जाऊदे, तुला पैशाची नड हाय म्हण की…जरा कारखान्यात ऊस जाऊ दे..काहीतरी देतो तुला..नंतर खुशाल परत दे सवडीनं…. पकूशेठः नाही. नको….निघतो.
नाना सबबी सांगून अनेकांनी पकूशेठच्या कर्जवसुलीची मोहीम कायमची थांबविली…आपल्या भिडस्त स्वभावामुळे नाही म्हणू न शकणारा एक चांगला माणूस समाजाने वापरुन फेकून दिला…अगदी त्याच्या गरजेलाही कोणी धाऊन आले नाही. पकूशेठला जे जाणवलं ते कधीतरी आपल्याला नक्कीच जाणवलेले असते..कारण कर्ज पैशांचीच असतात असं नाही..आणि नातीही रक्ताचीच असतात असंही नाही…. गेली ती उधारीउरला तो चकवा;बुडली ती मैत्रीकशाला आठवा..? दिसला तो जेव्हागाडीतून हसला;धक्का अन तेव्हाधसक्याहून बसला…